गरजूंना रोज २२०० अन्न पाकिटे पुरविणारे कोरोना योध्ये ठरताहेत पुण्यातील आदर्श

 पुणे/प्रतिनिधी : लॉकडाऊनच्या काळात कोणी रिकाम्या पोटी झोपू नये, या उदात्त हेतूने विविध क्षेत्रात कार्यरत कोविड योध्यांचा सुमारे २५ लोकांच्या समूह पुणे शहरातील रस्त्यावरील बेघर, निराधार लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यासाठी मैदानात उतरला आहे. जवळपास १०० अन्न पाकिटांच्या वाटपापासून झालेली सुरवात आज २२०० पाकिटांवर पोचली आहे. पोलिस अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ पत्रकार, उद्योजक, नोकरदारांपासून २५ ते ७० वयोगटातील विविध क्षेत्रातील स्वयंसेवक न थकता झोकून देऊन हे कार्य करीत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून तब्बल ३५ हजार बेघर, निराधार, परप्रांतीय मजूरांना यांनी अन्न पाकिटे पुरविली आहेत. अजूनही हे कार्य सुरूच असून नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. __पुणे कच्छी जैन समाज, अचलगाच जैन संघ पुणे आणि पीवायएसतर्फे (परफेक्टिंग यूथ सेशन) या कामी आर्थिक मदत दिली जाते. सकाळी प्रगती आराधना भवन, शनिवार पेठ, पुणे येथे स्वयंपाक करून पाकिटांचे पॅकेजिंग होते. हे सभागृह पुणे अचलगाच जैन समाजाने मदतीसाठी दिले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये अन्न पाकिटे वितरित करण्याची जबाबदारी दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास गवारे पहात आहेत. दरम्यान, गरजूंची असंख्य संख्या पाहता अन्न पाकिटांची संख्या १०० वरून ७०० पर्यंत वाढविली. त्यानंतर गरजेनुसार त्यात वाढ करण्यात आली. सध्या या कोरोना योध्यांतर्फे दररोज सुमारे २२०० अन्न पाकिटे तयार करून गरजूंना पुरविण्यात येत आहेत. या अन्न पाकिटात ४५० ग्रॅम ताजेतवाने अन्न असते. त्यात मसाला भात, डाळ खिचडी, पुरी भाजी आदीचा समावेश असतो. एक पाकिटात १ व्यक्तीचे एक वेळचे पूर्ण जेवण होते. ___३० मार्च पासून अविश्रांतपणे ही सेवा सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ३५ हजार गरजूंना जेवण पुरविण्यात आले आहे. तब्बल तीन महिन्यांपासून या कोरोना योध्ये भर उन्हात शहरातील असंख्य ठिकाणी फिरून, गरजूंना शोधून त्यांना ही सेवा देत आहेत. लॉकडाउन संपेपर्यंत अर्थात ३१ मेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. निरीक्षण आणि अन्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी पोलिस निरीक्षक (मल्टी-मिडिया आणि आयटी) प्रकाश खांडेकर, ‘पुणे पोलिस सोशलियाझिंग सेल'चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे पार पाडत आहेत. अन्नाचा दर्जा, स्वच्छता, त्याची गुणवत्ता राखण्यासह रेल्वेद्वारे परराज्यात जाणाऱ्या मजुरांना अन्न पुरविण्याची जबाबदारीही निभावत आहेत. विश्रामबागचे वाहतूक पोलिस कर्मचारी अनिल माने त्यांचे सहकारी - मालुसरे, राजेश लोखंडे हे देखील अन्न पाकिटे वाटपात मोलाची कामगिरी बजावत आहेत. या सेवेत कार्यरत स्वयंसेवकांचा दिवस सभागृहाची स्वच्छता, भांड्यांची सफाई करून सुरू होतो. त्यांनतर ते भाज्या, धान्य, तांदूळ धुवून, नंतर स्वयंपाक करतात. शेवटी पॅकिंग करण्यात येते. या दरम्यान, शारीरिक अंतर राखण्यासह परिसराचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात येते. या कामात कोणाचीही व्यावसायिक मदत घेतली जात नाही. उद्योजक, आयटी व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी, पत्रकार, पोलिस आदी वेगवेगळ्या व्यवसायातील स्वयंसेवक स्व-इच्छेने ही सेवा करीत आहेत. ज्येष्ठ पत्रकारच्या सेवा कार्याचे पोलिसांकडून कौतुक कोरोनाविरूध्द शहरातील पोलिस रात्रंदिवस जागून विविध ठिकाणी लढा देत आहेत. त्यांच्यासाठी धवल शहा, जिग्ना शहा हे दांपत्य रोज २०० बाटल्या ताक तयार करतात. ज्येष्ठ पत्रकार विजय अंबाडे हे सदगृहस्थ (वय ६८) हे त्यांच्या घरी जाऊन या बाटल्या घेतात. अंबाडे हे त्यांच्या ४० वर्षे जुन्या स्कूटरवरून फिरून भर दुपारी शहरातील प्रमुख पोलिस ठाण्यातील अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांना या ताकाच्या बाटल्या पुरवितात. यात विद्यापीठ पोलिस चौकी, चतुश्रृंगी वाहतूक पोलिस, शिवाजीनगर हेडक्वॉर्टर, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, अलका चौक, खंडोजीबाबा डेक्कन पोलिस ठाणे, स. प. महाविद्यालय, विश्रामबाग, फरासखाना, पेरूगेट आदी ठिकाणांच्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ते जागेवर जाऊन ताक देतात. गेल्या दोन महिन्यांपासून ते अविरतपणे, ६८ वर्षांच्या वयातही न थकता ही सेवा देत आहेत. तरूणांना लाजवेल अशा त्यांच्या कार्याचे पोलिसांकडून कौतुक होत आहे.


Popular posts from this blog

खळबळजनक ! लिफ्टच्या बहाण्याने 45 वर्षीय महिले बलात्कार करून लाखाचे दागिने लुटले, मुंढवा पोलीसांनी केले 24 तासात अटकु

खडकी शिक्षण संस्थेने नव्याने बांधलेल्या ‘स्व.चंद्रकांत मोहनलाल छाजेड सभागृहाचे उद्घाटन 14 मार्च रोजी